- अयाझ मेमन चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पराभव हा खूप मोठा आहे असे माझे मत आहे. ३५८ धावा उभारूनही पराभव होत असेल, तर याहून मोठे अपयश कोणते नसेल. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या विजयाची टक्केवारी ९९% अशी असते. त्यातही जमेची बाजू म्हणजे सामना घरच्या मैदानावर असताना सर्व गोष्टी सकारात्मक असतात. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार वर्चस्व मिळविले होते. मात्र आता ऑसीने नंतरचे दोन सामने जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.सर्वप्रथम ऑसी फलंदाजांना त्यांच्या खेळीचे श्रेय द्यावेच लागेल. एश्टन टर्नरने धमाकेदार खेळी करीत सामना फिरवला. याशिवाय पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाने २ फलंदाज लवकर गमावूनही ३५८ चे लक्ष्य पार केले. दखल घेण्याची बाब म्हणजे अॅरोन फिंच, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही ऑसीने बाजी मारली. भारताच्या पराभवाचे एक कारण म्हणजे, संघात सध्या प्रयोग सुरू आहेत. या सामन्यात भारताने आपला मुख्य संघ खेळविला नाही. मोहम्मश शमी, महेंद्रसिंग धोनी खेळत नव्हते. पण तरी या गोष्टींची कारणे तुम्ही देऊ शकत नाही. कारण जे खेळाडू या सामन्यात खेळले, त्यांचाही विचार विश्वचषक स्पर्धेसाठी होत आहे. त्यामुळे या खेळाडूंकडेही बऱ्यापैकी अनुभव आहे.अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंतकडे एक सुवर्ण संधी होती स्वत:ला सिद्ध करण्याची. पण यामध्ये तो अपयशी ठरला. जर त्याला धोनीची जागा घ्यायची असेल, तर त्याला धोनीपेक्षाही चांगली कामगिरी करावी लागेल. विशेषकरून यष्टीरक्षणामध्ये. त्यामुळे त्याच्याकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिवाय हँड्सकोम्ब-ख्वाजा आणि हँड्सकोम्ब-टर्नर यांची भागीदारी जसजशी वाढत गेली, तसतसे भारताचे वर्चस्व कमी होऊ लागले. ऑस्ट्रेलियाने ज्याप्रकारे धावांचा यशस्वी पाठलाग केला, ते पाहता भारताची गोलंदाजी खराब झाली. आणखी एक महत्त्वाची कमतरता भासली ती धोनीच्या सल्ल्याची. तो ज्याप्रकारे गोलंदाजांना सल्ला देत असतो, त्याची कमतरता या सामन्यात तीव्रपणे भासली. त्यामुळेच सामना हातून निसटू लागला, तेव्हा कर्णधार कोहलीही अस्थिर झालेला दिसला.एकूणच आता भारतीय संघ व्यवस्थापनाला पुन्हा विचार करावा लागेल असे दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी जवळपास संघ तयार असल्याचे दिसत होते, पण आता काही खेळाडूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी आपली छाप पाडली, पण त्यानंतर इतर फलंदाज व नंतर गोलंदाज अपयशी ठरले.पंतकडून निश्चित मोठ्या अपेक्षा आहेत, पण तरी त्याच्यावर मोठी टीका करणेही योग्य ठरणार नाही. तो अजूनही २१-२२ वर्षांचा आहे आणि कोणताही यष्टीरक्षक हा अनुभव वाढतो तसा प्रगल्भ होतो. विश्वचषक स्पर्धेसाठी धोनी पहिली पसंद असून दुसऱ्या पर्यायासाठी पंत आणि दिनेश कार्तिक यांचे नाव आघाडीवर आहे. माझ्या मते संघात एक फलंदाज म्हणून पंत स्थान मिळवू शकतो. कारण एक फलंदाज म्हणून तो नक्की यशस्वी ठरू शकतो. पण जर त्याने यष्टीरक्षणातही सुधारणा केली, तर तो त्याच्यासाठी ‘प्लस पॉइंट’ ठरेल. सध्या एक सामना अद्याप शिल्लक असून पंत की कार्तिक हे सांगणे कठीण आहे.(लेखक संपादकीय सल्लागार आहेत)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia: ऋषभ पंतने मिळालेली सुवर्णसंधी गमावली
India vs Australia: ऋषभ पंतने मिळालेली सुवर्णसंधी गमावली
अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंतकडे एक सुवर्ण संधी होती स्वत:ला सिद्ध करण्याची. पण यामध्ये तो अपयशी ठरला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 4:20 AM