मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चौथ्या वन डे सामन्यात 358 धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट आणि 13 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतकडून अनेक चुका झाल्या आणि भारताच्या पराभवाला त्या कारणीभूत ठरल्या. म्हणून पंतवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली. क्रिकेट जाणकारांनीही महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत मिळालेली संधीचं सोनं करण्यात पंत अपयशी ठरला, अशी प्रतिक्रिया दिली. पण, या टीकांना प्रत्युत्तर देण्यासाठी पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा फ्रंटफूटवर आले. त्यांनी धोनीही अनेकदा चुकला असे सांगून पंतचा बचाव केला.
मोहाली वन डे सामन्यात 21 वर्षीय पंतने दोन सोप्या स्टम्पिंगच्या संधी गमावल्या. 39व्या षटकात त्यानं प्रथम पीटर हँड्सकोम्बला जीवदान दिलं आणि त्यानंतर या सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या अॅस्टन टर्नरला बाद करण्याची संधी गमावली. त्यासह रन आऊट करण्यासाठी त्यानं धोनीच्या शैलीची कॉपी करण्याचा केलेला प्रयत्नही फसला. त्यावरून कर्णधार विराट कोहलीनंही नाराजी प्रकट केली होती.
या सर्व प्रकरणावर पंतचे प्रशिक्षक सिन्हा यांनी लोकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. पंत अजून शिकत आहे, असेही व्यक्त करताना त्यांनी धोनीसोबत होत असलेली तुलना त्याच्यावर दडपण निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले. ''धोनीसोबत केली जाणारी तुलना पंतवर प्रचंड दबाव निर्माण करत आहे. धोनीप्रमाणे पंतही यष्टिरक्षक-फलंदाज आहे. पण, त्यानं धोनीसारखी कामगिरी करून दाखवण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्याच्यावर हा दबाव नसेल तेव्हा तो चांगली कामगिरी करू शकेल,''असे सिन्हा म्हणाले.
सिन्हा यांनी पंतचा बचाव करताना धोनीच्या खराब कामगिरीची आठवण करून दिली. ते म्हणाले,''पंत आणि 14 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनी यांच्यात बराच फरक आहे. त्यावेळी धोनीवर इतके दडपण नव्हते जेवढे आता पंतवर आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला त्यावेळी भारताकडे दिग्गज यष्टिरक्षक नव्हता. पंतकडून स्टम्पिंग आणि कॅच सुटले. पण, अशा चुका करणारा तो एकटाच यष्टिरक्षक आहे का? धोनीकडूनही अशा चुका झाल्या आहेत.''