नवी दिल्ली : भारताचा सिनियर फलंदाज रोहित शर्माने १७ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी बँगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस चाचणी यशस्वी केली आहे. तो १४ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. इंडियन प्रीमियर लीगदरम्यान रोहितला स्नायूच्या दुखापतीने त्रस्त केले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी होऊ शकला नाही.
कोरोना व्हायरस महामारीमुळे ऑस्ट्रेलियात विलगीकरणाच्या नियमांमुळे रोहितला पहिल्या दोन कसोटीमध्ये खेळता येणार नाही, पण अखेरच्या दोन कसोटी सामन्यात तो संघात सहभागी होईल. रोहितची फिटनेस चाचणी एनसीएचे संचालक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. द्रविडकडे त्याला फिटनेस प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमानुसार तो सिडनी(७ ते ११ जानेवारी) आणि ब्रिस्बेन (१५ ते १९ जानेवारी) येथे खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी सराव करण्यापूर्वी १४ दिवस विलगीकरणात राहील. तो सिडनीला जाणार असून तेथेच एक आठवडा सराव करणार आहे.
गेल्या काही आठवड्यात रोहितच्या दुखापतीबाबत संभ्रमाची स्थिती होती. कर्णधार विराट कोहलीने याबाबत स्पष्टता नसल्याचे म्हटले होते.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे खेळताना रोहितचे स्नायू दुखावले होते. या दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये चार सामने बाहेर होता. त्यामुळे निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार केला नाही. भारतीय संघात स्थान मिळू शकले नसले तरी त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना फायनलमध्ये शानदार खेळी केली होती. त्यानंतर बीसीसीआयने ९ नोव्हेंबरला स्पष्ट केले होते की, रोहितला फिटनेस मिळविण्यासाठी केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा हा उपकर्णधार आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर यूएईतून ऑस्ट्रेलियात जाण्याऐवजी मुंबईत परतला.
कोहलीने त्यानंतर म्हटले होते की, रोहित ऑस्ट्रेलियामध्ये रिहॅबिलिटेशन का करीत नाही, हे मला कळले नाही. त्यानंतर बीसीसीआयने स्पष्ट केले की, तो त्याच्या आजारी वडिलांना बघण्यासाठी मुंबईत परतला आहे.
Web Title: India vs Australia : Rohit Sharma finally Pass in fitness test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.