Join us  

Dinesh Karthik-Rohit Sharma: मान पकडण्यापासून मिठी मारेपर्यंत, DK नं जिंकवून देताच रोहित शर्माच्या आनंदाला उधाण

या विजयाने आनंदात वेडा झालेला हिटमॅन रोहित मान पकडण्या ऐवजी फिनिशर डीकेला मिठी मारताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 9:32 AM

Open in App

नागपूर - काही दिवसांपूर्वीच मोहालीमध्ये भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या सामन्यावेळी नाराज झालेल्या कर्णधार रोहित शर्मा याने दिनेश कार्तिकची मान पकडली होती. हे सर्व भलेही गमतीत झाले असेल, पण, रोहितची नाराजी दिसून येत होती. आता रोहित आणि डीकेचे दुसऱ्या टी-20 सामन्यातील फोटोही समोर आले आहेत. यातील फरक एढाच, की यावेळी भारताचा विजय झाला आहे आणि या विजयाने आनंदात वेडा झालेला हिटमॅन रोहित मान पकडण्या ऐवजी फिनिशर डीकेला मिठी मारताना दिसत आहे.

खरे तर, झाले असे, की 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज एका बाजूने सातत्याने बाद होत होते. मात्र, रोहित एकटा अढळपणे उभा होता. यावेळी, भारतीय संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. पण अद्याप विजय मिळालेला नव्हता. अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता होती. यावेळी नवा फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत, केवळ देनच चेंडूंत भारताला विजय मिळवून दिला आणि सामना संपवला. यावेळी, विजयाच्या आनंदाने भारावलेला रोहित शर्मा एखाद्या शाळेतील मुलाप्रमाणे आनंद साजरा करताना दिसून आला.

तत्पूर्वी, खेळपट्टी ओली असल्याने सामन्याला विलंब झाला होता. यामुळे प्रत्येकी ८-८ षटकांचाच सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्या ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० धावा केल्या होत्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला १८ चेंडूत ३३ धावा करायच्या होत्या आणि हार्दिक पांड्या-रोहित ही जोडी खेळपट्टीवर होती. 

रोहितने सामन्यात पहिलेच षटक टाकणाऱ्या सीन अ‍ॅबोटला टार्गेट केले. त्या षटकात ११ धावा आल्याने भारताला १२ चेंडूंत आता २२ धावा करायच्या होत्या आणि ते सहज शक्य दिसत होते. हार्दिक (९) चांगली साथ देतोय असे दिसत असताना कमिन्सने त्याला स्लो चेंडूवर फटका मारण्यास भाग पाडले आणि फिंचने सहज झेल टिपला. रोहित असल्याने भारतीयांना विजयाचा विश्वास होता. भारताला ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. दिनेश कार्तिकने पहिलाच चेंडू सिक्स मारून ५ चेंडू ३ धावा असा सामना झुकवला. त्याने चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. रोहितने 20 चेंडूंत नाबाद 46 धावा करताना 4 चौकार व 4 षटकार खेचले. कार्तिकने 2 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 10 धावा केल्या. भारताने 6 विकेट्सने हा सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मादिनेश कार्तिक
Open in App