मेलबर्न कसोटीतील विजयानं भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक केले. आता तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुनरागमन करणार असल्याच्या चर्चांनी टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. पण, रोहितच्या समावेशाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी सामन्यानंतर केलेल्या व्यक्तव्यामुळे तशी चर्चा सुरू झाली आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. UAE तून भारताचा ३२ सदस्यीय ताफा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, परंतु रोहित वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला. तेथून तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. तेथून तंदुरुस्ती चाचणी पास करून तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीही पूर्ण केले. बुधवारी तो संघासोबतत सरावाला सुरूवात करणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तयारी करण्यासाठी त्याला ९ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
पण, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितची निवड ही त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे संकेत दिले. ३३ वर्षीय रोहित फक्त दोनच ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. पाच दिवसांच्या सामन्यासाठी त्याची तंदुरुस्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. ''बुधवारी रोहित शर्मा संघासोबत सरावाला सुरुवात करेल. त्याची शारीरिक तंदुरूस्ती काय सांगते, हे आम्ही पाहू, १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर तो मैदानावर उतरणार आहे. त्याला कसे वाटतेय हे जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ,''असे शास्त्री म्हणाले.