ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी यंदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. या दोघांनी भारताला अनेक सामन्यांत चांगली सुरुवात करुन दिली आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही ते सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न करतील. दमदार फटकेबाजी करत असताना त्यांना कर्णधार विराट कोहलीचा विक्रमही खुणावत आहे.
यंदाच्या वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा धवनच्या नावावर आहेत. 'गब्बर' धवनला कोहलीचा एका वर्षात सर्वाधिक ट्वेंटी-२० सामन्यातील धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 'हिटमॅन' रोहितलाही हाच विक्रम खुणावत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात कोण आघाडी घेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
धवनने निदाहास चषक स्पर्धेत ५ सामन्यांत १९८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध त्याने अर्धशतक केले. मात्र इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याला डावलले. त्याने दमदार पुनरागमन करताना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांत ४६ च्या सरासरीने १३८ धावा चोपल्या. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६ सामन्यांत ५६० धावा केल्या आहेत. विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याने तुफानी शतक झळकावत सर्वाधिक धावांच्या विक्रमात कोहलीला मागे टाकले. ऑस्ट्रेलियात मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याची बॅट चांगली तळपली आहे.