ॲडिलेड : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिका ‘थोडी आक्रमक’ व चुरशीही होऊ शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा अव्वल वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले. दरम्यान, मर्यादित षटकांच्या मालिकेत उभय संघातील खेळाडूंदरम्यान मैत्रिपूर्ण स्लेजिंग अनुभवायला मिळाले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना कमिन्स म्हणाला,‘स्लेजिंगचा विचार केला तर आतापर्यंत हा दौरा मैत्रिपूर्ण राहिला आहे. मैदानावर सर्व खेळाडू हसताना दिसले. पण, कसोटी क्रिकेटची बाब निराळी आहे. त्यात पाच दिवसापर्यंत खेळावे लागते. त्यात एवढी मैत्री दिसणार नाही कारण मालिका आव्हानात्मक राहील.’ मला विराट कोहलीला गोलंदाजी करण्याची प्रतीक्षा आहे, असे सांगत कमिन्स म्हणाला,‘ स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करावी लागत नसल्यामुळे मी खूश आहे. मी गेल्या आठवड्यात केन विलियम्सनची द्विशतकी खेळी बघितली. तो खेळत नसल्यामुळे खूश आहे. अनेकदा काही फलंदाजांसोबत प्रतिस्पर्धा उच्च दर्जाची असते. ग्लेन मॅकग्रा ज्यावेळी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा यांना गोलंदाजी करीत होता त्यावेळी अशा दर्जाची प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळत होती. काहीतरी घडेल म्हणून तुम्ही मालिका बघता.’ऑस्ट्रेलियाचा भावी कसोटी कर्णधार मानल्या जात असलेल्या कमिन्सने सांगितले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजही कर्णधार होऊ शकतो. तो म्हणाला,‘माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषविणे गोलंदाजासाठी सर्वात सोपी बाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त गोलंदाज कर्णधार नाहीत, पण असे का आहे, याचे कारण मला माहीत नाही.’कोहलीची देहबोली ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे : चॅपेल ॲडिलेड : महान फलंदाज व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये कोहलीची देहबोली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंप्रमाणे आक्रमक असते. त्याची कसोटी क्रिकेट खेळण्याची शैली नेहमीच आक्रमक असते, असेही ते म्हणाले.चॅपेल यांनी माजी क्रिकेटपटूंची तुलना महात्मा गांधींच्या आदर्शांसोबत करताना म्हटले की, कोहलीच्या आक्रमकतेमुळे भारतीय क्रिकेटच्या स्वरुपात बदल झाला आहे. सुरुवातीला अनेक भारतीय क्रिकेटपटू प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचे टाळत होते. कदाचित ते गांधींच्या सिद्धांतानुसार असेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia : मालिका चुरशीची होईल : कमिन्स
India vs Australia : मालिका चुरशीची होईल : कमिन्स
India vs Australia : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिका ‘थोडी आक्रमक’ व चुरशीही होऊ शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा अव्वल वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 4:44 AM