भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा दोन दिवसांचा खेळ समाप्त झाला आहे. सामन्यातील पहिल्या दोन दिवसांवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव ४८० धावावंवर संपला. तर दुसऱ्या दिवसअखेर भारताने बिनबाद ३६ धावांपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळात शेवटच्या षटकामध्ये रंगलेल्या नाट्याची सामना संपल्यानंतर चर्चा सुरू आहे.
भारताच्या डावातील दहाव्या आणि दिवसातील शेवटच्या षटकामध्ये हे नाट्य रंगलं. या षटकामध्ये नाथन लियॉनने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने खणखणीत फटका खेळत चेंडूला मिडऑनच्या वरून सीमारेषेपार भिरकावत सहा धावा मिळवल्या. शुमभनच्या या षटकारानंतरच खऱ्या नाट्यास सुरुवात झाली. त्याने खेळलेला हा फटका इतका शक्तिशाली होता की, चेंडू साइट स्क्रिनजवळ एका सिटच्या कोपऱ्यात जाऊन अडकला.
काही वेळ तिथे असलेल्या लोकांनी चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू काही सापडला नाही. त्यामुळे पंचांनी नव्या चेंडूसह सामना पुढे खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी एका प्रेक्षकाला हा चेंडू सापडला. त्यानंतर त्याने हा चेंडू मैदानावर फेकला. मग पंचांनी नवा मागवलेला चेंडू परत पाठवत ९.२ षटके झालेल्या चेंडूसह सामना पुढे खेळण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींदरम्यान, खेळ बराच काळ थांबलेला होता.
दरम्यान, सामन्याचा विचार केल्यास दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संगाने बिनबाद ३६ धावा काढल्या होत्या. रोहित शर्मा १७ तर शुभमन गिल १८ धावांवर नाबाद होते. मात्र भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप ४४४ धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ४८० धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाने १८० तर कॅमरून ग्रीनने ११४ धावांची खेळी केली. भारताकडून रविचंद्रन अश्विनने भेदक मारा करत ६ बळी टिपले.
Web Title: India Vs Australia: Shubman Gill's huge six and drama in the field, the game stopped for a long time, finally...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.