भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमधील चौथा कसोटी सामना ९ मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत भारताचा पराभव होणार नाही. मात्र आता ऑस्ट्रेलियाकडे चौथा सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्याची संधी आहे. यादरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी एक मोठी माहिती समोर आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यामध्येही स्टिव्हन स्थिथ ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियात आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्मिथ शेवटच्या कसोटीत संघाचं नेतृत्व करेल.
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमध्ये स्टिव्हन स्मिथने इंदूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व केलं होतं. दिल्ली कसोटीनंतर पॅट कमिन्स आई आजारी असल्यामुळे मायदेशी परतला. पॅट कमिन्स अद्यापही सिडनीमध्ये आहे. शेवटच्या कसोटीनंतर तीन एकदिवसीय सामनेही खेळवले जाणार आहेत. तसेच कमिन्सच्या खेळण्याबाबत त्यानंतर निर्णय होणार आहे.
स्मिथच्या नेतृत्वामध्ये ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी ९ विकेट्सने जिंकली होती. भारत मालिकेमध्ये २-१ ने आघाडीवर आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.