India vs Australia, 2nd ODI : अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. १४२ धावांचा भक्कम पाया रचल्यानंतर दोन्ही सलामीवीर मागोमाग तंबूत परतले. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ ( Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी केली. या दोघांनी कौशल्यपूर्ण फटके मारताना चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. स्मिथनं पुन्हा एकदा शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हैराण केलं. लाबुशेननंही अर्धशतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यात ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी म्हणजे सोने पे सुहागा....
वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नवदीप सैनीला टार्गेट करताना वॉर्नरने काही सुरेख फटके मारले. जसप्रीत बुमराहचे अपयश ही खरी टीम इंडियाची डोकेदुखी आहे. वॉर्नरला धावबाद करण्याची संधी भारतीयांनी गमावली आणि त्यानंतर त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. वॉर्नर-फिंचनं सलग दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
मोहम्मद शमीनं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. फिंच ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा करून माघारी परतला. फिंच व वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांचा भक्कम पाया रचला. त्यानंतर वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. लाँग ऑफवर असलेल्या श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) डायरेक्ट हिट करून वॉर्नरला बाद केले.
त्यानंतर स्टीव्हन स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पहिल्या वन डेत शतक करणाऱ्या स्मिथनं या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. ३५व्या षटकात विराटनं सहावा गोलंदाज म्हणून मायंक अग्रवालला पाचारण केले, परंतु स्मिथनं त्याचा समाचार घेतला. आक्रमक फटके न मारता गॅप शोधत स्मिथनं चौकार-षटकार खेचले. त्याच्या धावांचा वेग जबरदस्त होता. याही सामन्यात स्मिथनं ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. त्यानं ६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकार खेचून १०४ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं त्याची विकेट घेतली.
लाबुशेननं फटकेबाजी केली. रवींद्र जडेजानं त्याचा सोपा झेल सोडला. ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. लाबुशेन व मॅक्सवेल यांनीही आक्रमक खेळ केला. मॅक्सवेलनं आडवेतिडवे फटके मारून विराटला अचंबित केलं. कशीही गोलंदाजी करा मॅक्सवेलनं अतरंगी फटक्यानं सडेतोड उत्तर दिले. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. विशेष म्हणजे या खेळीत त्यानं केवळ ५ चौकार मारले. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या.