Join us  

India vs Australia : तक्रार करणे थांबवा, नियमांचं पालन करा अन् पुढे जा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा टीम इंडियाला सल्ला

भारतीय संघ ब्रिस्बेन येथे खेळण्यास अनुत्सुक आहेत, अशी चर्चा होती आणि त्यामुळे चौथी कसोटीही सिडनीत खेळवावी अशी विनंती त्यांच्याकडून केल्याचेही बोलले जात होते

By स्वदेश घाणेकर | Published: January 04, 2021 10:49 AM

Open in App

India vs Australia : रोहित शर्मासह टीम इंडियाच्या पाच खेळाडूंची कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याच्या चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाचा तपास करण्याची तयारी दर्शवली असताना रोहित, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. पण, या पाच खेळाडूंसह टीम इंडियाच्या सर्व सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून संघ सिडनी येथे दाखल झाला आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींत ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यानं तर नियमांचे पालन करणार नसाल, तर परत जा अशी धमकीच भारतीय खेळाडूंनी दिली. त्यात बीसीसीआयनंही चौथ्या कसोटीचे ठिकाण बदलण्याचा दबाव आणल्याची चर्चा आहे. आता यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन ( Nathan Lyon) यानं उडी मारली.

भारतीय संघानं तक्रार करणे थांबवावे, असा सल्ला त्यानं दिला. कोरोनाच्या कठोर नियमांमुळे ब्रिस्बन कसोटीचं ठिकाण बदलण्याची विनंती बीसीसीआयनं केल्याची चर्चा होती. त्यावरून लियॉन म्हणाला,''नियमांचं पालन करा आणि पुढे जा. दोन्ही संघातील काही खेळाडू सहा महिन्यांहून अधिककाळ बायो सुरक्षा बबलमध्ये आहेत, परंतु माझ्या दृष्टीनं क्रिकेटवर आपलं प्रेम आहे आणि त्यासाठी ही खूप छोटी तडजोड आहे. आपल्या खेळानं जगभरातील अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते.''

भारतीय संघ ब्रिस्बेन येथे खेळण्यास अनुत्सुक आहेत, अशी चर्चा होती आणि त्यामुळे चौथी कसोटीही सिडनीत खेळवावी अशी विनंती त्यांच्याकडून केल्याचेही बोलले जात होते. कोरोनाच्या कठोर नियमांमुळे अशी विनंती केली जात होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं रोहित शर्मासह पाच खेळाडूंना आयसोलेशनमध्ये राहावे लागेल, असे सांगितल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्याबाबत लियॉन म्हणाला,''भारतीय खेळाडूंनी चूक केली. त्यांनी ती मान्य करायला हवी आणि ही चर्चा इथेच थांबवायला हवी. पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करा आणि हा मुद्दा भरकटवू नका.'' ब्रिस्बेन कसोटीत लियॉन १०० वा सामना खेळणार आहे. त्यानं ९८ कसोटींती ३९४ विकेट्स घेतल्या आहेत. ''वैद्यकिय कर्मचारी काय सल्ला देत आहेत, ते ऐकायला हवं आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामुळे आम्हाला चांगली वैयकिय टीम मिळाली आहे. त्यामुळे तक्रार करणं थांबवा,''असेही तो म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माबीसीसीआय