Sunil Gavaskar, IND vs AUS: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या मैदानावर भारत कमबॅक करेल अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. आशिया चषकाप्रमाणेच मोक्याच्या क्षणी घडलेल्या चुकांमुळे टीम इंडियाला पहिल्या टी२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हार्दिक पांड्याच्या ७१ धावा आणि उपकर्णधार लोकेश राहुलचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने २० षटकात २००पार मजल मारली होती. पण गोलंदाजांची हाराकिरी आणि ढिसाळ फिल्डिंग यामुळे भारताला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियने फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला आणि सामना जिंकत १-०अशी मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.
"कालच्या सामन्यात दव हा फारसा प्रभावी विषय नव्हता. फिल्डर्स किंवा गोलंदाज चेंडू टॉवेलने पुसताना फारसे दिसले नाहीत. त्यामुळे गोलंदाजीतील प्रभाव कमी होण्यासाठी दव हे कारण असूच शकत नाही. त्यामुळे कारणं देऊ नका. मान्य करा की आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. उदाहरणच द्यायचं तर १९व्या षटकात फार धावा गेल्या. तोच खरा चिंतेचा भाग आहे. जेव्हा भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी गोलंदाज शिस्तबद्ध गोलंदाजीची अपेक्षा असताना भरपूर धावा देतो, तेव्हा ती बाब चिंता करण्यासारखीच असते", अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला.
"गेल्या तीन सामन्यात त्याने १९वे षटक टाकले आहे. त्याने एकूण १८ चेंडूंमध्ये तब्बल ४९ धावा दिल्या. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या फलंदाजांनी त्याला कुटून काढले. याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. भुवनेश्वर कुमार सारखा गोलंदाज १८ चेंडूत जास्तीत जास्त ३५-३६ धावा देईल अशी कोणत्याही संघाला अपेक्षा असते. पण तसं घडत नाही. तो अक्षरश: धावा लुटू देतो. इतकेच नव्हे तर हर्षल पटेलने देखील १८व्या षटकात ३ षटकार दिले आणि त्यामुळे त्या षटकात ऑस्ट्रेलियाने तब्बल २२ धावा लुटल्या. अशाप्रकारे गोलंदाजी केली तर सामने जिंकणे खरंच खूप कठीण होऊन बसेल", असे अतिशय गंभीरपणे सुनील गावसकर म्हणाले.
दरम्यान, कालच्या सामन्यात भारतीय संघाचे दोन स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. रोहित शर्मा ११ धावा काढून बाद झाला. विराटने आशिया कप स्पर्धेत चमक दाखवली होती. पण ऑस्ट्रेलियापुढे केवळ २ धावांत त्याला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे या दोघांचा फॉर्म हा देखील टीम इंडियासाठी T20 World Cup साठी चिंतेचा विषय ठरू शकतो असे चाहते सोशल मीडियावर बोलताना दिसत आहेत.