लाजिरवाण्या पराभवानंतर ‘किंग कोहली’विना रहाणेची कसोटी, बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा निर्धार

india vs australia : गेल्या काही वर्षात भारतीय संघाला ॲडिलेडसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागलेले नाही. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव आणि आपला सर्वोत्तम खेळाडू कोहलीविना उर्वरित सामन्यांत संघाला खेळावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 01:33 AM2020-12-26T01:33:02+5:302020-12-26T01:36:50+5:30

whatsapp join usJoin us
india vs australia : Team India determined to equalize without Kohli after embarrassing defeat | लाजिरवाण्या पराभवानंतर ‘किंग कोहली’विना रहाणेची कसोटी, बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा निर्धार

लाजिरवाण्या पराभवानंतर ‘किंग कोहली’विना रहाणेची कसोटी, बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : ॲडिलेडमध्ये ३६ धावांत गारद होण्याची नामुष्की ओढवणारा भारतीय संघ शनिवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्याच्या निर्धाराने उतरणार आहे, पण कर्णधार कोहलीच्या अनपस्थितीत त्यांच्यापुढे आव्हान खडतर राहील.
गेल्या काही वर्षात भारतीय संघाला ॲडिलेडसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागलेले नाही. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव आणि आपला सर्वोत्तम खेळाडू कोहलीविना उर्वरित सामन्यांत संघाला खेळावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेला दुहेरी भूमिका बजवावी लागणार आहे.
समाधानाची बाब म्हणजे भविष्यातील स्टार शुभमन गिल कसोटी पदार्पणासाठी सज्ज आहे. त्यात दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची उणीव भरून काढण्यासाठी मोहम्मद सिराजसारखा युवा गोलंदाज आहे.
पराभवापेक्षा हा पराभव ज्या पद्धतीने झाला त्याची सल अनेक वर्षे कायम राहणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये भारतीय खेळाडूंची खरी परीक्षा राहील. त्यांना आत्मविश्वास उंचावलेल्या टीम पेनच्या नेतृत्वाखालील संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पेन आपल्या कुटुंबाविना ख्रिसमस साजरा करीत आहे.
फॉर्मात नसलेल्या पृथ्वी शॉच्या स्थानी मयांक अग्रवालसह गिल डावाची सुरुवात करेल. पहिल्या कसोटीत स्वस्तात बाद झालेला मयांक या मैदानावर मोठी खेळी करण्यास प्रयत्नशील आहे. या मैदानावर मयांकने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळला होता.
सराव सामन्यात ७३ चेंडूंमध्ये शतक झळकावणारा ऋषभ पंत आक्रमक पद्धतीने खेळणे सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे. संघाला त्याची गरज आहे. त्याने २०१८-१९ च्या दौऱ्यात शानदार कामगिरी केली होती, पण गेल्या वर्षी त्याने फॉर्म व आत्मविश्वास गमावला. त्यामुळे त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंग व डोक्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तो आपल्या अष्टपैलू कामगिरीने व अनुभवाने उपयुक्त ठरेल. हनुमा विहारीला फलंदाजी क्रमामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे के.एल. राहुलला आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन म्हणाला की, आमचा संघ कसोटीमध्ये कुठली दयामाया दाखविणार नाही आणि ॲडिलेड कसोटीत खेळलेला संघ कायम असेल. कोहलीची उणीव भरून काढता येणार नाही, पण रहाणेला अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल. 
तो फलंदाजी क्रमामध्ये वर खेळण्याची शक्यता आहे. चेतेश्वर पुजारा संयमाने खेळू शकतो, पण रनरेट जलद राखणेही आवश्यक आहे, हे प्रशिक्षक शास्त्री यांना त्याला सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित फलंदाजांवर दडपण येणार नाही. शमीच्या अनुपस्थितीत बुमराह व उमेश यादव यांच्यावरील जबाबदारी वाढेल. भारतीय फलंदाजांना पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्या माऱ्याला सामोरे जाताना मानसिकदृष्ट्या कणखर व्हावे लागेल.

पीच रिपोर्ट
मेलबोर्न क्रिकेट मैदानावरील खेळपट्टी (एमसीजी) ॲडिलेडच्या खेळपट्टीप्रमाणेच आहे. येथेही वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहील. त्यामुळे फलंदाजांचा कस लागणार आहे. वेगवान गोलंदाजांना सीम व स्विंग दोन्ही मिळतील. तिसऱ्या सत्रात फिरकीपटूंनाही लाभ मिळेल. मेलबोर्नमध्ये वातावरण आल्हादकारक राहील. दरम्यान, काही वेळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, पण पावसाची शक्यता नाही.

प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरन ग्रीन, पॅट कमिंस, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नाथन लियोन. 
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
 

Web Title: india vs australia : Team India determined to equalize without Kohli after embarrassing defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.