ठळक मुद्देअॅरोन फिंच व स्टिव्हन स्मिथची शतकी खेळीफिंच-डेव्हिड वॉर्नर आणि फिंच-स्मिथ यांची शतकी भागीदारीमोहम्मद शमीनं घेतल्या सर्वाधिक ३ विकेट्स
India Vs Australia : अॅरोन फिंच ( Aaron Finch), स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith), डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या वन डे सामन्यात स्पष्ट केल्या. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटकाही टीम इंडियाला सोसावा लागला. फिंच आणि वॉर्नर यांनी संयमी पण, धावांचा वेग कायम राखणारी खेळी करून ऑस्ट्रेलियासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर स्मिथच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यात मॅक्सवेलनं भर टाकली... आयपीएल २०२०मध्ये ज्यांची बॅट थंडावली ( वॉर्नर वगळता), त्यांनी राष्ट्रीय कर्तव्यासाठी तुफानी खेळी केली. ऑस्ट्रेलियानं पाहुण्या टीम इंडियासमोर तगडं आव्हान उभं केलं.
फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२०मध्ये RCBसाठी अपयशी ठरलेल्या फिंचनं कमाल केली. त्यानं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. फिंच-वॉर्नरची भारताविरुद्धची ही चौथी दीडशतकी + भागीदारी ठरली. एकाच संघाकडून वन डेत सर्वाधिक १५०+ धावांची भागीदारी करणारी ही यशस्वी जोडी ठरली. विराट कोहली व रोहित शर्मा ( ३ वि. श्रीलंका) आणि रोहित शर्मा व शिखर धवन ( ३ वि. ऑस्ट्रेलिया) यांचा विक्रम आज ऑसी जोडीनं मोडला. ही जोडी तोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले. मोहम्मद शमीला नशीबानं वॉर्नरची विकेट मिळाली. वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला.
वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण ८ महिन्यानंतर पहिला वन डे सामना खेळणाऱ्या स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्मिथला पायचीत बाद दिले, परंतु त्यानं DRS घेत अम्पायरला निर्णय बदलण्यास भाग पाडले. त्यानंतरच स्मिथनं गिअर बदलला व फटकेबाजी केली. जडेजानं १० षटकांत एकही विकेट न घेता ६३ धावा दिल्या. ४० व्या षटकात जसप्रीत बुमराहनं ऑसींनी दुसरा धक्का दिला. अपरकट मारण्याच्या प्रयत्नात फिंच यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिस ( ०) पहिल्याच चेंडूवर चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथ व फिंच यांनी ३१-४० षटकांत ९५ धावा चोपल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावा जोडल्या.
युजवेंद्र चहलनं १० षटकांत १ विकेट घेताना ८९ धावा दिल्या. भारतीय गोलंदाजाची वन डे क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाणी कामगिरी आहे. यापूर्वीही २०१९मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध ८८ धावा दिल्या होत्या. चहलनं टाकलेल्या ४३ व्या षटकांत
ग्लेन मॅक्सवेलनं २१ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं मॅक्सवेलचा झेल सोडलाच शिवाय तो षटकारही दिला.
शमीनं मॅक्सवेलचा झंझावात रोखला. रवींद्र जडेजानं सुरेख कॅच टिपून टीम इंडियाला यश मिळवून दिलं. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथनंही ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून हे तिसरे जलद शतक ठरले. यापूर्वी २०१५मध्ये मॅक्सवेलनं श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत, तर जेम्स फॉल्कनरनं २०१३मध्ये भारताविरुद्ध ५७ चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.
Web Title: India Vs Australia: Team India Need 375 Runs To Win, Aaron finch & Steven Smith scored century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.