भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. आयसीसीच्या सध्याच्या कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे आमने सामने असतात तेव्हा रोमांच आपल्या शिखरावर असतो. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुजद्धच्या या मालिकेत एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली तर भारतीय एक मोठा विक्रम आपल्या नावे करेल. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले तर घरच्या मैदानावर हा भारताचा सलग १६ वा कसोटी मालिका विजय असेल. सध्या भारताने आपल्या घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तो सुद्धा एक विश्वविक्रम आहे.
भारतीय संघाने जर ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेमध्ये आपल्याच घरामध्ये नमवून सलग १६ वा कसोटी मालिका विजय मिळवला तर भारतीय संघ आपल्या विश्वविक्रमाला आणखी भक्कम करून घेईल. घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याच्याबाबतीत भारताच्या आसपासही कुणी नाही आहेत. भारतीय संघाने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याच्याबाबतीत भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर दोन वेळा सलग १० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.