भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना हा गुरुवारपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी अहमदाबादमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी गुजरात क्रिकेट संघटनेने लाल माती आणि काळी माती अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टीवरून भारतीय संघ अद्यापही द्विधा मनस्थितीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारतीय संघाला शेवटचा सामना जिंकणं आवश्यर आहे.
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी एक दिवस आधी गुजरात क्रिकेट संघटनेच्या एका सूत्राने सांगितले की, आमच्याकडे काळी आणि लाल अशा दोन्ही प्रकारच्या मातीने बनवलेल्या खेळपट्ट्या आहेत. चौथा कसोटी सामान कुठल्या खेळपट्टीवर खेळवायचा याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. भारतीय संघ उद्यापासून सुरू होणारा कसोटी सामना कुठल्या खेळपट्टीवर खेळेल हे अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पुन्हा एकदा सरप्राइज मिळू शकतं. गुजरात क्रिकेट संघटनेतील सूत्रांच्या माहितीनुसार भारताला एक स्पोर्टिंग विकेट मिळू शकते. मात्र रातोरात काहीही होऊ शकतं. अहमदाबादमध्ये दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही खेळपट्ट्या सध्या झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत. एका पिचवर गवत स्पष्टपणे दिसत आहे. तसेच त्याला सातत्याने पाणी दिले जात आहे.
चौथा कसोटी सामना कुठल्या खेळपट्टीवर खेळवला जाईल याचा निर्णय सामन्यापूर्वी काही वेळ घेतला जाईल. २०२१ मध्ये इथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामने खेळवले गेले होते. दोन्ही सामने वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळवले गेले होते. यामधील एक कसोटी सामना तर केवळ दोन दिवसांमध्येच संपुष्टात आला होता.
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेवर कब्जा करावा अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. मात्र अहमदाबादच्या खेळपट्टीने संभ्रम वाढवला आहे. इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच सुरुवातीच्या दिवसांमध्ये इथे फलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा फलंदाजांचा विचार असेल. या मैदानावर खेळल्या गेलेल्या १८ सामन्यांपैकी ८ सामन्यांचा निकाल लागला आहे. गेल्या तिन्ही कसोटी सामन्यांचा निकाल लागलेला आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवलाय. इथे केवळ २ सामन्यात भारतीय संघाचा पराभव झालेला आहे.