पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी भारतीय संघाला नमवले. त्यामुळे मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत आघाडी घेण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर त्यांचे मनोबल चांगलेच उंचावले असून 'बॉक्सिंग डे' कसोटीत ते विराट कोहलीच्या संघाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तिसऱ्या कसोटीत मालिकेत आघाडी घेण्याचा दृष्टीने ऑस्ट्रेलियाने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने हाच विजयी संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या पीटर हॅण्ड्सकोम्बने संघातील स्थान कायम राखले आहे. जायबंद झालेला सलामीवर अॅरोन फिंचही संघात कायम आहे आणि त्याच्या बोटाला झालेली दुखापत सुधारत असल्याचे, प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले.