पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थवर खेळवण्यात आलेली दुसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंच्या शेरेबाजीमुळे जास्त चर्चेत राहिली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 146 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा दुसरा डाव 140 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडले. त्याच्या या कृत्यावर नेटिझन्स चांगलेच संतापले. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने तर ऑसी कर्णधार टीम पेनचे कौतुक करताना कोहलीला कोपरखळी मारली.
पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत कमबॅक करण्याचे आव्हान आहे. अॅडलेड कसोटीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला मालिका खिशात घालण्याचे स्वप्न पडू लागले होते. मात्र, दुसऱ्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाने पलटवार करताना मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर एकमेकांना हात मिळवत होते. त्यावेळी कोहली व पेन समोरासमोर आले. कोहलीने हात मिळवला, परंतु त्याने पेनकडे रागाने पाहिले. क्रिकेट चाहत्यांना कोहलीचे हे वागणं पटलं नाही.