ठळक मुद्देऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-1 अशी बरोबरीपर्थ कसोटीत भारताचा दारूण पराभवतिसरी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे
पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत कमबॅक करण्याचे आव्हान आहे. अॅडलेड कसोटीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला मालिका खिशात घालण्याचे स्वप्न पडू लागले होते. मात्र, दुसऱ्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाने पलटवार करताना मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. सलामीवीरांचे अपयश आणि चुकीची संघ निवड या कारणामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात कोहलीची चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. फलंदाजांच्या अपयशामुळे रोहितला कसोटी संघात खेळवण्याची मागणी जोर धरत असताना या निर्णयाने भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. अॅडलेड कसोटीत भारताने विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, भारताचा हा आनंद दुसऱ्या कसोटीतच विरला. यजमान ऑस्ट्रेलियाने पर्थवर कमबॅक करताना 146 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत रोहितला खेळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण, रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेणार आहे.
अॅडलेड कसोटीत रोहितला खेळवण्यात आले होते, परंतु त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत बाकावर बसवण्यात आले. रोहित कसोटीतही ट्वेंटी-20 क्रिकेटप्रमाणे खेळतो. त्याने अॅडलेड कसोटी अनुक्रमे 37 व 1 धाव केली. त्याच्या खेळण्याच्या शैलीवर टीका झाली. अॅडलेड कसोटीत कमरेच्या दुखण्याचे कारण देत त्याला बसवण्यात आले.
पर्थवरील पराभवानंतर त्याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पत्नी रितिका साजदेह गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे आणि त्यासाठी रोहित ऑस्ट्रेलिया दौरा सोडून भारतात परतणार आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी रोहितला पत्नीसोबत राहायचे आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने याबाबत अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रोहितचे भारतात परतणे पक्के आहे आणि तसे झाल्यास कोहलीकडे फलंदाजीचा एक पर्याय कमी होईल.
Web Title: India vs Australia Test : Rohit Sharma will leave Australia series for his wife pregnancy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.