India vs Australia Test series: भारतीय संघाची खरी कसोटी आगामी टेस्ट सीरिजमध्ये लागणार आहे. २०२३ मध्ये भारतीय संघाने युवा ब्रिगेडला सोडत घेताना वन डे, ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. पण, आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक द्वंद्व छेडले गेले आहे आणि भारतीय संघ मैदानावरील कामगिरीतू त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्याविरुद्ध खेळण्याची तयारी केली आहे. अश्विनविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. अश्विनसारखी गोलंदाजीची अॅक्शन असणाऱ्या नेट बॉलरला बोलावून बॅटिंगची प्रॅक्टिस सुरु करण्यात आली आहे. महेश पिथीया असं या गोलंदाजाचे नाव असून त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथला नेट्समध्ये गोलंदाजी केली. यावेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियन संघाने भारतातील मालिका सुरू होण्यापूर्वी बंगळुरूमध्ये आपला तळ ठोकला आहे. येथे खास स्टेडियम बुक करण्यात आले असून, त्यात ऑस्ट्रेलियन संघ सराव करत आहे. भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहे, त्यांनी आधीच खेळपट्टीत खड्डे करुन सराव करत आहेत. म्हणजेच कसोटीच्या तिसर्या-चौथ्या दिवशी ज्या पद्धतीने खेळपट्ट्या आहेत, त्यासाठी ते आधीच तयारी करत आहे.
दरम्यान, भारतीय संघाने २०२३ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका यशस्वीपणे जिंकल्या. आता ९ फेब्रुवारीपासून भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २०२०-२१च्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कांगारू दाखल झाले आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमधील त्यांचे स्थान निश्चित केलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"