India vs Australia Test series: भारतीय संघाची खरी कसोटी आगामी टेस्ट सीरिजमध्ये लागणार आहे. २०२३ मध्ये भारतीय संघाने युवा ब्रिगेडला सोडत घेताना वन डे, ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. पण, आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक द्वंद्व छेडले गेले आहे आणि भारतीय संघ मैदानावरील कामगिरीतू त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळेच ही मालिका संपूर्ण मनोरंजनाने भरलेली असेल यात शंकाच नाही.
भारतीय संघाने २०२३ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका यशस्वीपणे जिंकल्या. आता ९ फेब्रुवारीपासून भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २०२०-२१च्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कांगारू दाखल झाले आहेत. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमधील त्यांचे स्थान निश्चित केलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे.
रोहित शर्मा अँड टीमला ही मालिका जिंकून WTC Final साठी आपले स्थान पक्कं करता येणार आहे आणि कांगारू हे सहजासहजी शक्य होऊ देणार नाहीत. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत सर्वाधिक उणीव जाणवेल ती रिषभ पंतची... मागची मालिका त्याने गाजवली होती. श्रेयस अय्यरही नागपूर कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि अशात सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पण करू शकतो. ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज ( २-०) आणि दक्षिण आफ्रिका ( २-०) यांच्याविरुद्धची मालिका जिंकून भारतात दाखल झाला आहे.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
- पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
- दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
- तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला
- चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
संघ ( Squads)
- भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
- ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
कुठे पाहता येईल ( Telecast and streaming details)
- भारत-ऑस्ट्रेलिया सामना सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू होईल आणि स्टार स्पोर्ट्सवर तो पाहता येईल. Disney+ Hotstar app आणि JioTV वरही ही मॅच दिसेल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"