India vs Australia Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकली आणि टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. पण, मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात टीम इंडियाला झटका देताना पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला माघारी पाठवले. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ ( Steven Smith) यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. यावेळी स्मिथनं २०२०-२१ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कोण जिंकेल, असा प्रश्न विराटला विचारला आणि त्यानंही उत्तर दिलं.
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला होता. यावेळी स्मिथनं कसोटी मालिकेचा निकाल काय असेल, असा सवाल विराटला केला. स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यामुळे यंदा टीम इंडियासमोर खडतर आव्हान असेल, असे उत्तर विराटनं दिलं.
''बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखण्यास आम्हाला आवडेल. मागील ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी अविस्मरणीय होता. तू आणि डेव्हिड वॉर्नर त्यावेळी खेळत नव्हते, परंतु तरीही आम्हाला ऑसी गोलंदाजांकडून कडवी टक्कर मिळाली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी मजबूत आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद आणखी तपासण्याची संधी आम्हाला मिळणार आहे,''असे विराट म्हणाला.