ब्रिस्बेन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना 21नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्याची हिेच संधी असल्याचे अनेकांना वाटत आहे. भारतीय खेळाडूंची ऑस्ट्रेलियातील कामगिरी काही अपवाद वगळता तितकी चांगली झालेली नाही. मात्र, यंदा भारताला इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मालाही तसेच वाटते. येथील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांमुळे फलंदाज हैराण होत असले तरी रोहितला खेळपट्टयांची भीती वाटत नाही.
ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव अविश्वसनीय असतो. येथील चाहते चांगल्या खेळीचे नेहमी कौतुक करतात, असे मत रोहितने व्यक्त केले आहे. रोहितने येथे खेळलेल्या 16 वन डे सामन्यांत 57.50 च्या सरासरीने 805 धावा केल्या आहेत. तो म्हणाला,''मुंबईत सिमेंटच्या खेळपट्टीवर खेळून मी लहानाचा मोठा झालो. त्याचा ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन व पर्थ येथील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर मला फलंदाजी करताना मदत मिळेल.''
रोहितने ऑस्ट्रेलियात वन डे क्रिकेटमध्ये तीन शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याला या दौऱ्यात कसोटी संघातही स्थान मिळण्याची शक्यता आहे. ''मी येथे याआधी चांगली कामगिरी केली आहे. खरं आव्हान कसोटी मालिकेत आहे, परंतु सध्या मी ट्वेंटी-20 मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे,'' असे रोहित म्हणाला.
भारताला 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत हार मानावी लागली. मात्र, ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास रोहितने व्यक्त केला. तो म्हणाला,'' 2016 मध्ये आम्ही येथे आलो होतो. तेव्हा ट्वेंटी-20 मालिकेत आम्ही 3-0 असा विजय मिळवला होता. उसळी घेणारी खेळपट्टी हे येथील आव्हान आहे. मात्र, आमच्या संघातील बऱ्याच खेळाडूंकडे येथे खेळण्याचा अनुभव आहे.''