Join us  

India Vs Australia: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होणार दोन मोठे बदल, तर या दोघांना मिळणार संधी, असा असेल संघ

India Vs Australia: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी कुठलीही जोखीम पत्करण्याची शक्यता नाही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 9:49 AM

Open in App

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मात्र गुरुवारपासून सुरू होणारा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारतीय संघाल या सामन्यात विजय मिळवावा लागेल. अशा परिस्थितीत इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी कुठलीही जोखीम पत्करण्याची शक्यता नाही आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या कसोटीमधून विश्रांती देण्यात आली होती. त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं. तर पहिल्या तीन सामन्यात खेळलेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. इंदूर कसोटीत खेळणाऱ्या उमेश यादवने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात ३ विकेट्स मिळवले होते. त्यामुळे त्याला संधी मिळने निश्चित मानले जात आहे.

तसेच चौथ्या कसोटी सामन्यासाठी ईशान किशनलाही कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये के.एस. भरतला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नाही. तीन कसोटी सामन्यातील ५ डावांत मिळून त्याने केवळ ५७ धावा काढल्या आहेत. तर ईशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीमधून ईशान किशनचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होऊ शकते.

भारतीय संघाला कुठल्याही समिकरणांच्या जंजाळात न अडकता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असल्यास चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. मात्र सामना अनिर्णित राहिल्यास किंवा पराभव झाला तरी भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी असेल. ऑस्ट्रेलियन संघाने इंदूर कसोटीमधील विजयासह अंतिम फेरी गाठली होती. तर आता भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये अंतिम फेरीत खेळण्यासाठी चुरस आहे.

चौथ्या कसोटीसाठी असा असू शकतो भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघइशान किशनमोहम्मद शामी
Open in App