मेलबर्न - भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने केली. कसोटीपाठोपाठ भारतीय संघाने यजमानांना पराभवाची चव चाखवली आणि इतिहास घडविला. मेलबर्नवर भारताने तिसरा वन डे सामना सात विकेट राखून जिंकला आणि वन डे मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. त्यात भर म्हणून भारतीय संघाने वन डे मालिकाही जिंकली. मालिका विजयानंतर खेळाडूंना देण्यात आलेल्या रकमेवरून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आयोजकांना धारेवर धरले.
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या.
मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळालेला युजवेंद्र चहल आणि .मॅन ऑफ दी सीरिज जिंकलेला महेंद्रसिंग धोनी यांना आयोजकांनी ५०० डॉलरचा चेक देउन थट्टा केली का , असा सवाल गावस्करांनी केला. ते म्हणाले," फक्त ५०० डॉलर ( ३५००० रुपये) ? आयोजकांनी या मालिकेतून इतका पैसा कमावला आणि खेळाडूंना किती दिले? त्यांनी खेळाडूंना योग्य बक्षीस रक्कम का दिली नाही? खेळाडूंमुळेच ही मालिका झाली."