सिडनी : पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत विलगीकरणात वास्तव्य करणे फारच आव्हानात्मक आहे. बाहेर आल्यानंतर आयुष्य सामान्य वाटते. तरीही आम्ही कोविड प्रोटोकॉलबाबत भयभीत नसल्याचे सांगून भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने जैव सुरक्षा नियमांवरून सुरू झालेला वाद निवळण्याचा प्रयत्न केला. सिडनीतील जैव सुरक्षा नियमांमुळे भारतीय संघ नाराज असल्याचे येथील मीडियाने प्रसिद्ध केले होते.
रहाणेने दौऱ्यातून माघार घेणाऱ्या अज्ञात वृत्ताचा इन्कार केला. तो म्हणाला, ‘संघाचे लक्ष सिडनी कसोटीत विजय मिळविण्यावर केंद्रित झाले आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीची तक्रार केलेली नाही.
सामन्यात चांगली सुरुवात करून विजयावर शिक्कामोर्तब करणे आमचे ध्येय्य असेल.’ तिसरा कसोटी सामना आटोपल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतू शकतो, अशी शक्यता आहे का, असा प्रश्न करताच रहाणेने उत्तर देण्याचे टाळले. ‘आम्ही खेळाडू असल्याने केवळ खेळणे आमचे काम आहे. बाकीच्या गोष्टी ठरविण्याचे काम व्यवस्थापनाचे आहे,‘’ इतकेच तो म्हणाला.
बीसीसीआय आणि सीएचे अधिकारी खेळाडूंना क्वीन्सलॅन्डमध्ये काही सवलती देण्यासंदर्भात विचार करीत आहेत. याविषयी रहाणे म्हणाला, ‘खेळाडू मैदानावर एकत्र असतील. हॉटेलमध्ये मात्र खोलीत एकांतवासात राहण्याचे बंधन आहे. किमान एकमेकांशी संवाद साधण्याची तसेच सायंकाळी एकत्र जेवण घेण्याची मुभा मिळायला हवी.’
आम्ही विचलित नाहीयेथे खेळाडूंना हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडता येत नाही. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी तर आणखी कठोर नियम आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रहाणे म्हणाला, ‘सिडनीत जनजीवन सामान्य असले तरी हॉटेलमधील वास्तव्य आव्हानात्मक वाटते. आम्ही मात्र विचलित झालेलो नाही. आमची गरज काय हे जाणतो. ’क्वीन्सलॅन्ड येथे जैव सुरक्षा वातावरणात खेळाडू एकमेकांना भेटू शकतील, असे मानले जात आहे.