नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरी कसोटी आधी धर्मशालाच्या मैदानावर होणार होती. मात्र, मैदान अद्यापही सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले नसल्याने हा सामना बंगळुरू किंवा विशाखापट्टनमला होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाचे क्युरेटर तपोश चटर्जी यांनी मैदानाचे परीक्षण करण्यासाठी धर्मशालाचे मैदान गाठले होते. मात्र, खेळपट्टी आणि आऊटफिल्ड अद्यापही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज नसल्याचे त्यांनी बीसीसीआयला कळवल्याने हा सामना दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कुठलेही मैदान आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यायोग्य तयार होण्यासाठी बीसीसीआयचे काही मापदंड आहेत. याच निरीक्षणांअंती धर्माशालाचे मैदान अद्यापही सज्ज नसल्याचे बीसीसीआयच्या लक्षात आले आहे. तसेच तिसरा सामना सुरू व्हायला १६ दिवसांचा कालावधी आहे. तेथील वातावरणामुळेसुद्धा मैदान तयार करण्यासाठी अडचणी येत आहेत.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला वेळ दिला तर आम्ही अद्यापही मैदान पूर्णपणे सज्ज करण्याचा तयारीत आहोत. मात्र, अंतिम निर्णय बीसीसीआयच घेऊ शकते. बऱ्याच काळापासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
दिल्ली कसोटीत वॉर्नरला डच्चू मिळणार?
सिडनी : भारताविरोधात नागपूर कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात डेविड वॉर्नरच्या जागी अष्टपैलू खेळाडू ट्रॅवीस हेड याला संधी दिली जाऊ शकते. रविवारी ऑस्ट्रेलियन मीडियाने हा दावा केला आहे. बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नागपूर कसोटीत तिसऱ्याच दिवशी पराभव स्वीकारला. त्यात अनुभवी फलंदाज वॉर्नरचा खराब फॉर्म कायम राहिला. दोन्ही डावात तो एक आणि दहा धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फक्त ९१ धावांवर बाद झाला. भारताविरोधातील त्यांची हा सर्वांत कमी धावसंख्या आहे. वॉर्नरच्या दुहेरी अपयशाची मोठी चर्चा आहे. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटले आहे की, फिरकीपटू मॅट कुहनमनला नवी दिल्लीत कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याला राखीव फिरकीपटू मिशेल स्वेपसनच्या जागी संघात स्थान मिळाले आहे.
कुहनमनला मिळणार संधी : मॅकडोनाल्ड
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे की, पुढच्या कसोटीत ऑस्ट्रेलिया तीन फिरकीपटूंसह खेळू शकते. त्यावेळी मिशेल स्वेपसन याच्या जागी डावखुरा फिरकीपटू मॅट कुहनमन याला संधी मिळू शकते. दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. कुहनमन हा लेग स्पिनर स्वेपसनच्या जागी ऑस्ट्रेलियन संघातून खेळू शकतो. स्वेपसन हा पूर्वयोजनेनुसार मुलाच्या जन्मासाठी स्वदेशात परत जाणार आहे. तिसऱ्या कसोटीच्या आधी भारतात परत येईल. मॅकडोनाल्ड यांनी रविवारी सांगितले की, ‘ कुहनमनकडे संघातून खेळण्याची संधी आहे. जर आम्ही तीन फिरकीपटूंसोबत खेळलो तर नक्कीच फायदा होईल.’ कुहनमनला आंतरराष्ट्रीय सामन्याचा कोणताही अनुभव नाही. त्याने १३ प्रथम श्रेणी सामन्यात ३५ बळी घेतले आहेत. कुहनमन सध्या व्हिक्टोरियाकडून खेळत आहे. त्याने म्हटले की, सकाळी फोन आला होता. आणि वॉर्मअपसाठी जात होतो. माझा पासपोर्ट बॅगमध्ये होता. मी पहिली कसोटी पाहिली आणि टॉड मर्फीने चांगला खेळ केला आणि जडेजाची गोलंदाजीदेखील पाहिली आणि भारतात जाण्यासाठी उत्सुक आहे.’
मॅकडोनाल्ड यांना ग्रीनच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच त्याचा अखेरचा एक्स-रे स्कॅन होईल आणि त्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतात.’ स्टार्क पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. तो दुखापतीतून सावरल्यावर येथे पोहोचला आहे. त्यांनी सांगितले की, स्टार्क आज आराम करेल. तो उद्या सराव करु शकतो. जोश हेझलवुड च्या पायाला दुखापत झाली आहे. तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला तीन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे.’