मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या होत्या. शिखर धवनचे शतक आणि रोहित शर्मा यांच्या 193 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे 359 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतचे गचाळ क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरले. पंतने या सामन्यात सोप्या संधी गमावल्याने नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले. संघाचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन वन डे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याची उणीव चौथ्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच त्याला वर्ल्ड कपपूर्वी संधी मिळावी म्हणून धोनीला विश्रांती देण्यात आली. पण, धोनीच्या अनुपस्थितीत पंतनं चमकण्याची संधी गमावली. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या समावेशाची मागणी जोर धरू लागली आहे.
फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पंतने एक झेल सोडला, तर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर दोन स्टम्पिंगच्या संधी गमावल्या. त्याने सामन्यात धोनीची कॉपी करण्याचाही प्रयत्न केला. त्याला ही कॉपी महागात पडली आणि धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर धोनी...धोनी... नावाचा गजर घुमला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 2 बाद 12 अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारी रचली. पण जसप्रीत बुमराने ख्वाजाला बाद केले आणि ही जोडी फोडली. पण त्यानंतर हँड्सकॉम्बने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पहिले शतक झळकावले. हँड्सकॉम्बने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 117 धावा केल्या. हँड्सकॉम्ब बाद झाल्यावर फक्त दुसरा सामना खेळणाऱ्या अॅश्टन अगरने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. टर्नरने या सामन्यात 43 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 83 धावांची महत्वाची खेळी साकारली.