India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. जवळपास ९ महिन्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. त्यात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रेक्षकांवीनाच खेळवण्यात आल्या, परंतु ही मालिका त्याला अपवाद ठरली आहे. ऑस्ट्रेलियानं या मालिकेसाठी स्टेडियमवर प्रेक्षकांना एन्ट्री दिली आहे. कोरोना संकटात असा धोका पत्करणे क्रिकेटपटूंना महागात पडू शकतो आणि तसा प्रकार आजच्या सामन्यात घडला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला. ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल मार्शच्या जागी स्टीव्ह स्मिथला संधी दिली, तर टीम इंडियासाठी शिखर धवनसह मयांक अग्रवाल सलामीला खेळणार आहे. मनीष पांडे, शुबमन गिल, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन हे आजच्या सामन्याला मुकले.
या सामन्याचे सहावे षटक संपल्यानंतर एक प्रेक्षक मैदानावर अदानीला विरोध करणारे फलक घेऊन आला. खेळपट्टीच्या मधोमध उभ राहून त्यानं हे फलक झळकावलं. सुरक्षारक्षकांना काही कळालेच नाही आणि त्यामुळे सामना पाच मिनिटे थांबला होता. त्या प्रेक्षकाला हटकण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षकाचे अवाढव्य रूपपाहूनही त्याची चर्चा रंगली.