सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. कोहलीने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 64 धावांचा खेळ केला. कोहलीने ही खेळी करून आगामी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशारा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोहलीची बॅट तळपेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंग याने कसोटी मालिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू नसेल, असे भाकित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या मालिकेत धावांचा रतीब घालेल, अशी भविष्यवाणी पाँटिंगने केली.
तो म्हणाला,''ख्वाजा हा कसोटी क्रिकेटमधील कसलेला फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तो भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऑस्ट्रेलिया संघासाठी तो हुकूमाचं पानं आहे. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल आणि मालिकावीरचा पुरस्कारही तोच पटकावेल.''