वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. टीम इंडियानं आजच्या सामन्यात चार बदल केले. टी नटराजननं वन डे संघात पदार्पण केले, तर शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनीही अंतिम अकरामध्ये स्थान पटकावले. नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मयांक आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या विराटनं २३वी धाव घेताना विक्रमाला गवसणी घातली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२००० धावांचा विक्रम विराटनं नावावर केला. विराट-शुबमन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण, अॅश्टन अॅगरनं शुबमनला ( ३३) पायचीत करून ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.