मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला चर्चेचा विषय आहे. कारण एक फलंदाज आणि कर्णधार म्हमूनही त्याने नाव कमावले आहे. पण आता तर त्याची गणना थेट सर्वकालिन महान फलंदाजांच्या यादीमध्येही केली जात आहे.
विराटनं 89 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावला. विराटच्या नावावर आता 172 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 11208 धावा आहेत. धोनीच्या नावावर 332 सामन्यांत 11207 धावा होत्या. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग 15444 ( 324 सामने) धावांसह अव्वल स्थानी आहे. विराट चौथ्या स्थानावर आहे. त्याच्याआधी दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( 14878 धावा) आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग ( 11561) आघाडीवर आहेत.
विराटवर आता भारतातीलच नाही तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने पिछाडीवरून २-१ अशी जिंकली या मालिकेत कोहलीने दमदार फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने कोहलीचे कौतुक केले आहे. फिंच म्हणाला की, " भारताकडे विराट कोहलीसारखा दिग्गज फलंदाज आहे. कोहली हा सध्याच्या घडीला सर्वकालिन महान क्रिकेटपटू आहे. या यादीमध्ये भारताचा रोहित शर्मादेखील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये असेल. भारताचे हे दोन्ही अनुभवी खेळाडू महत्वाच्या सामन्यांमध्ये नेहमीच आपले योगदान देत आले आहेत."
फिंच पुढे म्हणाला की, " तिसऱ्या सामन्यात शिखर धवन खेळू शकला नाही. त्यामुळे रोहितने आपल्या फलंदाजीमध्ये काही बदल केला. धवन आतापर्यंत चांगल्या फॉर्मात होता. पण तो तिसऱ्या सामन्यात खेळला नसला तरी भारताची फलंदाजी चांगली झाली. रोहितने सलामीवीराची भूमिका उत्तम बजावली."