India vs Australia : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मंगळवारी सकाळी मायदेशात परतण्यासाठी रवाना झाला आहे. त्यानं उर्वरित तीन कसोटी सामन्यांची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली आहे. पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं BCCIकडे सुट्टीचा अर्ज केला होता आणि त्यामुळे पहिल्या कसोटीनंतर तो मायदेशात परतणार आहे. भारतात परतण्यापूर्वी विराटनं संघातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबल उंचावले.
विराटनं सर्व खेळाडूंसोबत एकत्र आणि वैयक्तिक चर्चा केली. त्यात त्यानं खेळाडूंना उर्वरित तीन कसोटींमध्ये स्वतःला झोकून खेळ करण्याचा सल्ला दिला. अॅडलेड कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल खचले होते. पण, विराटनं या सर्वांशी चर्चा केली आणि त्यांना मैदानावर दमदार कामगिरी करण्याचा सल्ला देत खेळाडूंचे मनोबल उंचावले. २६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे.
''आज सकाळी कोहलीनं ऑस्ट्रेलिया सोडलं. मायदेशात रवाना होण्यापूर्वी त्यानं सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांचे मनोबल उंचावले. त्यानं अधिकृतपणे कर्णधारपदाची जबाबदारी रहाणेकडे सोपवली आणि मैदानावर स्वतःला झोकून देण्याचा सल्ला दिला. रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत संघासोबत खेळणार आहे, त्यामुळे रहाणेवर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे मोठे आव्हान आहे,''असे सूत्रांनी ANIला सांगितले.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. त्यानंतर तो सिडनीत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण, बीसीसीआयनं सांगितले की,''रोहित शर्मा सिडनीत सुरक्षित आहे. तो बायो सुरक्षित वातावरणात आहे आणि सध्या १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्कात आहेत. तेथील परिस्थिती बिघडल्यास, BCCI रोहितला तेथून बाहेर काढण्यास प्रयत्न करणार.''