ब्रिस्बेन : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापासून सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशात विजयी पताका रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे आणि या मालिकेत कोहलीला 'कॅप्टन कूल' धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला होता.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-20 मालिकेत कोहली संघाचा भाग होता. त्याने पहिल्या सामन्यात 55 चेंडूंत 90 धावा करताना भारताला 37 धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 59 धावांची खेळी करताना भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. तिसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक करताना भारताला निर्भेळ यश मिळवून दिले.
यावेळी कोहली कर्णधाराच्या भूमिकेत आहे आणि त्याला धोनीच्या नेतृत्वाखाली झालेला विक्रम पुन्हा करायचा आहे. पण, हा विक्रम करताना संघात धोनी नसणार आहे. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्याचा चांगलाच कस लागणार आहे.