राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३६ धावांनी विजय मिळवता आला. हा सामना भारताने कसा जिंकला, याचे रहस्य आता समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. पण या पराभवाची सव्याज परतफेड भारताने दुसऱ्या सामन्यात केली भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले आणि पराभवाचा बदला घेतला.
पहिल्या सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने दुसरी लढत जिंकली. हा मोठा बदल भारतीय संघाला झाला तरी कसा, याची उत्सुकता तुम्हाला असेल. कारण भारतीय संघात नेमका बदल झाला तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून तीन सलामीवीर खेळले होते. रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले होते. त्यामुळे ट्वेन्टी-२० लढतीत फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना एकदिवसीय सामन्यात संधी कशी द्यायची याचा विचार संघ व्यवस्थापनाने केला. कोहली हा तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येतो. पण या सामन्यात कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात भारताची धावगती मंदावली होती आणि भारताला तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नव्हता.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने आपली ही चूक सुधारली. दुसऱ्या सामन्यात कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजी आला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना कोहलीने चेंडूंत ७८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर धवनबरोबर कोहलीने शतकी भागीदारीही रचली. पहिल्या सामन्यात राहुल तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. पण या सामन्यात तो पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला आणि त्याने ५२ चेंडूंत ८० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे भारताला या सामन्यात ३४० धावा करता आल्या. कोहलीने ही चूक सुधारल्यामुळेच भारताने हा विजय मिळवला, असे चाहते म्हणत आहेत.