नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसऱ्या एकदिवसीय लढतीत सर्वांचे लक्ष होते ते ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर. कारण ट्वेन्टी-20 सामन्यातली त्याची फलंदाजी साऱ्यांनी पाहिली होता आणि त्याचा धसकाही घेतला होता. पण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज फलंदाजाला फक्त चारच धावा करता आल्या. कारण भारताचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा सल्ला ऐकत कुलदीप यादवने बॉलहल्ला केला आणि त्यामध्ये मॅक्सवेलसारखा योद्धा धारातीर्थी पडल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या सामन्यात मॅक्सवेल हा स्थिरस्थावर झाला होता. त्यानंतर आता तो मेठे फटके मारण्याच्या तयारीत होता. मॅक्सवेलची देहबोली पाहून धोनीला ते समजले. त्यावेळी धोनी गोलंदाजी करत असलेल्या कुलदीपला म्हणाला, " मॅक्सवेल मोठे फटके बनवण्याच्या तयारीत आहे, तु स्टम्पवरच चेंडू टाकत राहा." धोनीचा सल्ला टाळणे म्हणजे घोडचूक असते, हे कुलदीपलाही माहिती होते. कुलदीपने स्टम्पच्या पट्ट्यातच चेंडू टाकला. हा चेंडू लेग साईडला मारण्यासाठी मॅक्सवेल सरसावला. पण मॅक्सवेलला यावेळी मोठा फटका मारता आला नाही. त्याचे टायमिंग चुकले आणि क्लीन बोल्ड होऊन तो तंबूत परतला. या उदाहरणावरून धोनी संघात असणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित होत आहे.
धोनीचं डोकं चालतं लय भारी, केदार-विराटही झाले चकित!महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यात कधी काय चालेल, हे सांगता येत नाही. तो एक अवलिया आहे. तो स्वत: नेमकं काय करतो, हे कोणालाही कळत नाही. दुसरीकडे समोरचा खेळाडू काय करणार आहे, हे तो उत्तमपणे जाणतो. या गोष्टीचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आला.
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने अॅडम झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात धोनीने अशी एक गोष्ट केली, सर्व चकित झाले. ही गोष्ट घडली ती 33व्या षटकात. केदार जाधव हा 33वे षटक टाकत होता. चेंडू कसा टाकायचा हे सल्ले तो केदारला देत होता. केदारने एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. त्यावेळी फलंदाज नेमका कोणता फटका मारणार, हे धोनीला कळून चुकले होते. धोनी ऑफ स्टम्पच्या बाहेर उभा होता. फलंदाज आता पॅडल स्विप मारणार, हे धोनीला समजले. चपळ धोनी तिथून थेट लेग स्लिपच्या जागेपर्यंत पोहोचला. फलंदाजही पॅडल स्विप खेळला. लेग स्लिपला गेलेल्या धोनीच्या ग्लोव्ह्जला यावेळी चेंडू लागला. जर हा झेल पकडला गेला असता तर तो आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल ठरला असता. धोनीची ही गोष्ट पाहिल्यावर कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवही चकित झाले.