Join us  

India vs Australia : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात असूनही दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही; जाणून घ्या कारण 

India vs Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 20, 2020 1:06 PM

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाला  कर्णधार विराट कोहलीशिवाय ( Virat Kohli) या मालिकेत आता पुढील सामने खेळावे लागणार आहेत. पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराट मायदेशात रवाना होणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे, परंतु दुसऱ्या कसोटीत तो विराटला रिप्लेस करू शकत नाही. BCCIनं तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी रोहितचे नाव संघात दाखल केले आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. ऑस्ट्रेलियातील नियमाप्रमाणे त्याला १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. रोहितचा क्वारंटाईन कालावधी २९ डिसेंबरला पूर्ण होत आहे आणि त्यावेळी दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस असेल. त्यामुळेही रोहित दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. 

दुखापतीमुळे रोहितला वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघातून विश्रांती देण्यात आली होती. तो ७ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत अॅक्शन मध्ये दिसेल. भारताला पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियानं ८ विकेटनं पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

आता टीम इंडियासमोरील पर्याय काय?अजिंक्य रहाणे ( कर्णधार), मयांक अग्रवाल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, हनुमा विहारी, उमेश यादव

असा असेल अंतिम ११ संघपृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. सहाच्या जागी रिषभ पंतचा पर्याय आहे, पण सहालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल. 

दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहली