मतीन खान
भारतीय संघ यावेळी चॅम्पियनच्या थाटात खेळतो आहे. विश्वचषकातील सर्व सामने भारताने जिंकले आहेत. रोहित शर्माने सर्व सामन्यांमध्ये आक्रमक सुरुवात करून दिली. मोहम्मद शमीने वेगवान माऱ्याची व्याख्या बदलून टाकली आहे. विराट कोहलीच्या कामगिरीचा संघाला पुरेपूर फायदा झाला आहे. सर्व योग चांगले जुळून आल्याने या खेपेला विश्वचषकावर भारताचेच नाव कोरले जाईल, असेच चित्र दिसत आहे.
१४० कोटी जनतेचे स्वप्न
त्या काहीच तासांत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जवळपास १ लाख २० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारत- ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आमने-सामने असतील तेव्हा निळ्या सागरापुढे निळे आकाशही ठेंगणे झालेले असेल. भारतीय संघाला तिसऱ्यांदा विश्वविजेते झालेले पाहण्याची सर्वांना आस लागली आहे.
भारताने आक्रमक शैलीत दहा सामने जिंकून प्रतिस्पर्धी संघांना दणका दिला. हा संघ चॅम्पियनसारखाच भासतो. विश्वविजेते होण्याची भारताकडे खरेच संधी आहे का? चला जाणून घेऊया.
एक विश्लेषण असेही....
n ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास या संघाने दहापैकी ८ सामने जिंकले खरे; पण हा संघ धोकादायक वाटत नाही.
n उपांत्य सामन्यात २१३ धावांचे लक्ष्य गाठण्यास त्यांना ७ फलंदाज गमवावे लागले. अफगाणिस्तानविरुद्ध मॅक्सवेल त्यांच्या मदतीला धावून आला होता. धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध ३८८ धावांचा डोंगर उभारल्यानंतरही ते केवळ ५ धावांनी जिंकू शकले.
n हा संघ आधीसारखा बलाढ्य राहिलेला नाही; पण ऑसीला बाद फेरीच्या सामन्यांत चॅम्पियन संबोधिले जाते. या संघापासून सावध राहावेच लागेल.
प्रेरणादायी रोहित शर्मा
n स्वत:च्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद पटकावून देणारा रोहित शर्मा भारताला आयसीसी चषक जिंकून देईल, या आशेपोटी त्याच्याकडे राष्ट्रीय संंघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.
n धोनीच्या नेतृत्वात २०१३ ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.
n रोहितने स्वत:च्या नेतृत्वाने या विश्वचषकात नवा पायंडा पाडला. नेतृत्वासोबतच सर्वच सामन्यांत त्याने आक्रमक सुरुवात करून दिली.
n १५० च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा केल्या. या बळावर प्रतिस्पर्धी संघावर वरचढ होण्याची सुरुवात करून दिली.
n गोलंदाजीच्या वेळी तो प्रतिस्पर्धी संघांना अडकविण्यासाठी जाळे विणत आहे, असेच वाटत होते. सावध; पण विचाराअंति तो पाऊल टाकतो. त्याच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे सहकारी खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला दिसतो.
शमीची अप्रतिम गोलंदाजी
सुरुवातीच्या चार सामन्यांत भारत सहा गोलंदाजांसह खेळला. हार्दिकची भूमिका अष्टपैलू खेळाडूची होती. तो जखमी होताच मोहम्मद शमीरूपी वादळाने वेगवान माऱ्याची व्याख्या बदलून टाकली. केवळ ६ सामन्यांत २३ बळी ही कामगिरी शमीची वाटचाल सांगण्यास पुरेशी आहे. बुमराहचा फॉर्म आणि फिटनेस महत्त्वपूर्ण ठरला. सिराज महागडा ठरला तरी वेळोवेळी त्याने यश मिळवून दिले.
कुलदीपची कामगिरी चांगलीच अधोरेखित झाली. रवींद्र जडेजानेदेखील स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला. भारताने अखेरचे सहा सामने ५ गोलंदाजांसह खेळले आणि पाचही जणांनी काम फत्ते केले. ता सर्व मुद्यांचा विचार केल्यास भारत विजयाचा प्रबळ दावेदार वाटतो.
शमीने जवळपास प्रत्येक ११ चेंडूंत १ गडी बाद केला. एका बळीसाठी त्याने ९ धावा दिल्या. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी फिरकीपटू ॲडम झम्पा याने एका बळीसाठी २१ धावा मोजल्या. एक बळी घेण्यासाठी त्याला सामन्यात २४ चेंडू टाकावे लागले आहेत.
रोहित शर्माने स्पर्धेत २८ षटकार आणि ६२ चौकार मारले, तर ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने २४ षटकार आणि ४९ चौकार मारले आहेत.
विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय संघातील ११ भारतीय फलंदाजांची सरासरी ४६ इतकी, तर ऑस्ट्रेलियाची सरासरी ३३ अशी राहिली. भारतीय गोलंदाजांनी एका बळीसाठी १७, तर ऑस्ट्रेलियान गोलंदाजांनी एका बळीसाठी ३९ धावा मोजल्या आहेत.
(लेखक लोकमत समूहाचे स्पोर्ट्स हेड तथा सहायक उपाध्यक्ष, आहेत)
Web Title: India vs Australia worldcup final, mauka, mauka..! This opportunity will not come again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.