India vs Australia, WTC 23 : ऑस्ट्रेलियाचा संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2023) फायनलमधील स्थान पक्के करण्यासाठी ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आतापासूनच तयारीला लागला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांचे 8 खेळाडू पुढील महिन्यात चेन्नईच्या MRF अकादमीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यात विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) या युवा स्टार फलंदाजाचाही समावेश आहे. भारतीय संघ पुढील 4 महिने वेगवेगळ्या देशांचे दौरे करत राहणार आहे, तर ऑसी खेळाडू भारतात येऊन यजमानांना हरवण्याच्या तयारीला पुढील महिन्यापासून सुरूवात करताना दिसणार आहेत.
ICC World Test Championship 2021 - 2023 Standing : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका 71.43 टक्क्यांसह अव्वल क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 70 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या तरी हे दोन संघ लॉर्ड्सवर पुढील वर्षी होणाऱ्या WTC Final च्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पाकिस्तान ( 58.33) आणि भारत ( 52.08 ) हे दोन संघ अजूनही शर्यतीत आहेत. भारतासाठी बांगलादेशविरुद्धच्या दोन व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी मॅच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांनी हे सहाही सामने जिंकले तर त्यांचे 68 टक्क्यांपर्यंत आगेकूच होईल आणि ते अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरू शकतील.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे चार कसोटी सामने डिसेंबरमध्ये होणार आहेत. त्यासाठी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचे 8 खेळाडू चेन्नईत 10 दिवसांच्या कॅम्पसाठी येणार आहेत. यात विल पुकोव्हस्कीचेही नाव आहे. 24 वर्षीय विलने 2021मध्ये भारताविरुद्ध एक कसोटी मॅच खेळली होती आणि त्यात त्याने 62 व 10 धावा केल्या होत्या. ती मॅच ड्रॉ राहिली होती. पण, भारताने मालिका 2-1अशी जिंकली होती.
विलसह सलामीवीर हेन्री हंट, जोश फिलिप, टिग विलीए व कूपर कोनोल्ली आणि फिरकीपटू मॅट कुहनेमन, टॉड मर्फी व तनवीर संघा हेही चेन्नईच्या अकादमीत येणार आहेत. विलने तीन वन डे व 10 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. हे 8 खेळाडू स्थानिक खेळाडूंसह सराव करती आणि दोन दिवसीय व वन डे मॅच खेळतील. श्रीलंकेचा माजी अष्टपैलू थिलान समरवीरा या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे, तर ग्लेन मॅकग्राथही कोचिंग स्टाफमध्ये आहे.