India vs Australia, 3rd Test : भारतीय चाहत्यांची चातकासारखी प्रतीक्षा अखेर बुधवारी संपली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला. १६ डिसेंबरला सिडनी येथे आलेल्या रोहितनं १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि आता तो तिसऱ्या कसोटीसाठी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी हिटमॅन मेलबर्नला दाखल झाला आणि त्यानं सहकाऱ्यांची गळाभेट घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी रोहितचे ताफ्यात दाखल होण्यानं खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला आहे.
मेलबर्नच्या हॉटेलमध्ये रोहित दाखल होताच भारतीय खेळाडूंनी त्याचे स्वागत केले. रोहितनं रवींद्र जडेजा, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्यासह अनेकांची गळाभेट घेतली. यावेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी तू तरुण दिसतोस, अशी कौतुकाची थाप मारली. ते म्हणाले,''क्वारंटाईन कालावधी कसा होता मित्रा?, तू तरुण दिसतोस.''
पाहा व्हिडीओ..
तिसऱ्या कसोटीत Playing XI मध्ये तीन बदल
उमेश यादवच्या जागी तिसऱ्या कसोटीसाठी टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचे खेळण्याची शक्यताही अधिक आहे. लोकेश राहुलचा संघात समावेश आहे, परंतु त्याला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी कधी मिळेल, हा सवाल प्रत्येक जण करतोय. हनुमा विहारीच्या अपयशानं लोकेश राहुलच्या अंतिम ११मधील मार्ग मोकळा झाला आहे. तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल, हनुमा व उमेश ( दुखापतग्रस्त) यांच्या जागी रोहित शर्मा, लोकेश राहुल व टी नटराजन यांच्यासह अजिंक्य रहाणे अंतिम ११ खेळाडू घेऊन मैदानावर उतरणार आहे.
टीम इंडियाचे संभाव्य Playing XI - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, टी नटराजन