नागपूर: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या, गुरुवारपासून व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती खेळपट्टीवर भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड समाधानी नव्हते. त्यांना या खेळपट्टीवर गवत दिसले. द्रविड यांनी लगेचच निर्देश देत खेळपट्टी बदलण्याची सूचना केली. त्यांची सूचना अमलातदेखील आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविड यांनी मध्यवर्ती खेळपट्टीऐवजी शेजारी असलेल्या खेळपट्टीला कसोटीसाठी तयार करण्याचे क्यूरेटरला निर्देश दिले. व्हीसीएने धावपळीत बदल केल्यामुळे साइट स्क्रीनची जागादेखील बदलण्यात आली, शिवाय सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्याचे स्थान देखील हलवावे लागले.
याआधीदेखील व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर २००४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत अशा प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. टीम इंडियाच्या निर्देशानुसार खेळपट्टी तयार झालेली नाही, असे ध्यानात येताच तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भारत बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पराभूत झाला होता. गांगुली यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची व्हीसीएला सूचना केली होती. त्यानंतरही खेळपट्टीवर गवत शिल्लक ठेवण्यात आले. खेळपट्टी वेगवान माऱ्यास पूरक असल्याचे जाणवताच गांगुली यांनी स्वतःला आजारी घोषित करून सामन्यातून अंग काढून घेतले होते.
भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित
भारतातील पारंपरिक कसोटी खेळपट्टीवर सुरुवातीच्या दोन दिवसांत चांगल्या धावा निघतात. तिसया दिवसापासून खेळपट्टी फिरकीला अनुकूल बनत जाते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरकीपटूंचे वर्चस्व निर्माण होते. अशावेळी नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरतो. आधी फलंदाजी करणारा संघ ५०० धावा काढत असेल तर सामना जिंकण्याची त्यांची शक्यता अधिक असते.
खेळपट्टीवर होते गवत-
सूत्रानुसार, कसोटीसाठी व्हीसीएने जी खेळपट्टी बनविली, ती फिरकीला अनुकूल जाणवत नव्हती. स्थानिक परिस्थितीत पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल ठरतील अशा खेळपट्ट्या भारतीय संघाला लाभदायी ठरतात. द्रविड यांनी खेळपट्टीचे निरीक्षण करताच फिरकीला मदत मिळणार नाही, असे त्यांच्या ध्यानात आले असावे. त्यांनी लगेच शेजारची खेळपट्टी सामन्यासाठी तयार करण्याचे निर्देश दिले. खेळपट्टी बदलल्यामुळे साइट स्क्रीन आणि कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलण्यात आली.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"