रांची - एकदिवसीय मालिकेत वर्चस्व गाजवणा-या भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला टी-20 सामनाही सहज जिंकला. पावसामुळे सामन्याचा वेळ वाया गेल्याने भारताला डकवर्थ-लुईस नियमानुसार विजयासाठी सहा षटकात विजयासाठी 48 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
शिखर धवन (15) आणि कर्णधार विराट कोहलीने (22) भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 18.4 षटकात 118 धावा झाल्या होत्या. अरॉन फिंचचा (42) अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म कायम असून त्याला फक्त 17 धावा करता आल्या. फिरकी गोलंदाज यझुवेंद्र चहलने त्याला बुमराहकरवी झेलबाद केले. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. कुलदीपने चार षटकात 16 धावांच्या मोबदल्यात दोघांना माघारी धाडले. बुमराहने दोन, चहल, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांडयाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका 4-1 च्या फरकाने जिंकली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.
दरम्यान कर्णधार स्टीव्ह स्मिथला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. अजिंक्य राहणेला टी-20 मालिकेतून वगळण्यात आले असून त्याची जागा शिखर धवनने घेतली. पत्नीच्या आजारपणामुळे शिखर धवन एकदिवसीय मालिकेत खेळला नव्हता.
सामन्यात पावासाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यताभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शनिवारी खेळल्या जाणा-या पहिल्या टी-२० लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी दुपारी रांचीमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.