ठळक मुद्देविराट कोहलीला खुणावतोय विक्रमएका खेळीने मोडणार दोन विक्रमभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना गुरुवारपासून
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर धावा करण्यात नेहमी आनंद मिळतो. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटीत अवघ्या आठ धावा कोहलीला महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या पंगतीत नेऊन बसवणार आहे.
आठ धावा करताच कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करेल आणि तेंडुलकर, लक्ष्मण व द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरणार आहे. कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करून यजमानांना धोक्याचा इशारा दिला आहे. कोहलीने घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 92च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने 8 डावांत 692 धावा केल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनंतर ( 769) त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. त्या मालिकेत कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं.
ऑस्ट्रेलियात कोहलीने यजमानांविरुद्ध 8 सामन्यांत 992 धावा केल्या आहेत. त्याला 1000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 8 धावा हव्या आहेत. ऑस्ट्रेलियात त्यांच्याचविरुद्ध 1000 धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. या विक्रमात तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 1991-2012 या कालावधीत 20 सामन्यांत 1809 धावा केल्या आहेत आणि त्यात सह शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ लक्ष्मण ( 15 सामन्यांत 1236 धावा) आणि द्रविड ( 15 सामन्यांत 1143 धावा) यांचा क्रमांक येतो.
याव्यतिरिक्त कोहलीला आणखी एक विक्रम करण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्याचा पराक्रम नावावर करण्यासाठी त्याला 13 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरणार आहे. वैयक्तीक विक्रमांपेक्षा कोहलीला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची नामी संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची अनुपस्थिती भारतासाठी फलदायी आहे.
Web Title: India vs Australis Test : Virat Kohli 8 runs away from major milestone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.