भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य बांगलादेशनं ७ विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद ६० धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारताच्या पराभवाचं खरं कारण सांगितले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ९९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा विक्रम रोहितने नावावर करताना महेंद्रसिंग धोनीचा (९८) विक्रम मोडला. रोहित (९) पहिल्याच षटकात माघारी परतला. तरीही ट्वेंटी-२० सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनने नावावर केला. त्याने विराट कोहलीला मागे टाकले. शिखर धवन ( ४१), श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (२७) यांनी चांगला खेळ केला. कृणाल पांड्या ( १५) आणि वॉशिंग्टन सुंदर (१४) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.