भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना 148 धावाच करता आल्या. शिखर धवन, रिषभ पंत वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. पण, बांगलादेशच्या गोलंदाजांप्रमाणे टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही खेळपट्टीच्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतला. पण, सौम्या सरकार - मुशफिकर रहीम यांनी भारताच्या चमूत तणाव निर्माण केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या हातून सामना खेचून आणला. रहीमनं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतावर पहिला विजय मिळवून दिला. DRSचा चुकलेला निर्णय भारतासाठी घातकी ठरला. बांगलादेशनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला. नवव्या प्रयत्नांत बांगलादेशला टीम इंडियाला ट्वेंटी-20त पहिल्यांदा नमवण्यात यश आले.
कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानं पहिल्या षटकात दोन चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला तंबूत परतावे लागले. शफिऊल इस्लामने त्याला पायचीत ( LBW) केलं. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शिखर धवनच्या सल्ल्यानं रोहितनं DRS घेतला. पण, चेंडू त्याच्या यष्टींचा वेध घेऊन जात असल्याचे दिसले आणि रोहितला माघारी परतावे लागले. रोहित अवघ्या 9 धावांत माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुलकडून अपेक्षा होती, पण अमिनुल इस्लामच्या गुगलीवर तो सोपी झेल देऊन बाद झाला.
शिखर धवनची मोठे फटके मारताना चाचपडत होता. दुसऱ्या बाजूनं मात्र श्रेयस अय्यरनं आक्रमक पवित्रा घेतला होता. ही जोडी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होती. या दोघांची 34 धावांची भागीदारी अमिनुलने मोडली. त्यानं श्रेयसला 22 धावांवर मोहम्मद नइमच्या हाती झेलबाद केले. भारताच्या 10.2 षटकांत 3 बाद 70 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सर्वांचे लक्ष कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतकडे लागले होते. पंत मात्र मोठे फटके खेळताना चाचपडताना दिसला. पण, शिखर आणि रिषभ यांच्यात ताळमेळ जुळलेच नाही.
15व्या षटकात धवन धावबाद झाला. धवनने 42 चेंडूंत 41 धावा केल्या. पदार्पणवीर शिवम दुबे 1 धावा करून माघारी परतला. फिरकीपटू अफिफ होसैनने त्याच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत दुबेला माघारी पाठवले. पंतने एका बाजूनं खिंड लढवली, पण भारताला समाधानकारक पल्ला गाठून देता आला नाही. पंतला 27 धावांवर शफिऊलने बाद केले. भारताला 6 बाद 148 धावा करता आल्या. कृणाल पांड्या (15*) आणि वॉशिंग्टन सुंदर ( 14*) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली.
खलील अहमदनं 17व्या षटकात 58 धावांची ही भागीदारी मोडली. त्यानं सरकारला ( 39) त्रिफळाचीत केले. त्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर रहीमचा सोपा झेल कृणाल पांड्यानं सोडला. त्यानंतर रहीमनं सामना एकहाती फिरवला, त्यानं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20त टीम इंडियावर पहिला विजय मिळवून दिला. खलीलच्या 19व्या षटकात रहीमनं चार चेंडूंत चार चौकार खेचून बांगलादेशला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. रहीमनं 43 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या.