भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानं पहिल्या षटकात दोन चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली, परंतु षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला तंबूत परतावे लागले. शफिऊल इस्लामने त्याला पायचीत ( LBW) केलं. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शिखर धवनच्या सल्ल्यानं रोहितनं DRS घेतला. पण, चेंडू त्याच्या यष्टींचा वेध घेऊन जात असल्याचे दिसले आणि रोहितला माघारी परतावे लागले. रोहित अवघ्या 9 धावांत माघारी परतला, परंतु त्यानं या कामगिरीसह एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितनं या कामगिरीसह कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला.
आता बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. नाणेफेकीला येताच रोहितनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील एक विक्रम आपल्या नावावर केला. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि धोनी प्रत्येकी 98 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 खेळणारे भारतीय खेळाडू होते. आता रोहितच्या नावावर 99 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने झाले आहेत.
प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहितनं पहिल्या पाच चेंडूत दोन चौकारांसह 9 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. त्यानं कोहलीचा 2450 धावांचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर आता 2452 धावा आहेत.