भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप स्पर्धा गाजवल्यानंतर रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येताना धावांचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं मालिकावीराचा पुरस्कार पटकावताना अनेक विक्रमी केळी केल्या होत्या. आता बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला.
नवी दिल्लीत होणाऱ्या सामन्यात आठ षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाही भारतीयाच्या नावावर नसलेला विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची संघी रोहितला आहे. रोहितच्या खात्यात सध्या एकूण 392 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. त्यात 50 षटकांच्या सामन्यातील 232, ट्वेंटी-20तील 109 षटकार आहेत. यात आणखी आठ षटकारांची भर पडल्यास रोहितच्या नावावर मोठा पराक्रम नोंदवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार खेचणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. या क्लबमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 534) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( 476) यांचा समावेश आहे.
पण, नाणेफेकीला येताच रोहितनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील एक विक्रम आपल्या नावावर केला. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि धोनी प्रत्येकी 98 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 खेळणारे भारतीय खेळाडू होते. आता रोहितच्या नावावर 99 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने झाले आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारत रचणार इतिहास, आजचा सामना आहे खास!
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यावर हवा प्रदुषणाचे सावट आहे आणि सामना रद्दही होण्याची शक्यता आहे. पण, जर हा सामना झाला, तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी तो ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. आजच्या दिवसभरात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने झाले आणि भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा सामना होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 1000 वा सामना ठरणार आहे. फेब्रुवारी 2005मध्ये पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात आला होता आणि 14 वर्षांत क्रिकेटच्या या फॉरमॅटनं 1000 सामन्यांचा पल्ला गाठला आणि भारत व बांगलादेश यांना तो ऐतिहासिक सामना खेळण्याचा मान मिळणार आहे.