India vs Bangladesh, 1st Test : चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३७६ धावांत आटोपला आहे. पहिला दिवस गाजवल्यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला ४०० पार धावसंख्येच्या पुढे घेऊन जाईल, अशी अपेक्षा होती. पण तस्कीन अहमद याने भारताची सेट झालेली जोडी फोडत बांगलादेशच्या संघाला मोठा दिलासा दिला. तस्कीन याने दुसऱ्या दिवसाच्या खेळातील तिसऱ्या षटकात जडेजाला तंबूत धाडले. पहिल्या दिवसाअखेर ८६ धावांवर नाबाद राहिलेला जड्डू दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीला एकही धाव न करता तंबूत परतला.
तस्कीनलाच मिळाली अश्विनची विकेट
भारताच्या धावफलकावर ३४७ धावा असताना रवींद्र जडेजाला तंबूत धाडल्यानंतर तस्कीन अहमद याने ३६७ धावांवर आकाश दीपच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का दिला. त्याने ३० चेंडूत संघाच्या धावसंख्येत १७ धावांची भर घातली. पहिल्या दिवशी विकेट न मिळालेल्या तस्कीन अहमदनं दुसऱ्या दिवशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अश्विनलाही आपल्या जाळ्यात अडकवले. अश्विनने १३३ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांची आश्वासक खेळी केली. दुसऱ्या दिवशी अश्विनला फक्त एक धाव करता आली.
बुमराहच्या विकेटसह हसन महमूदचा पंजा; भारतात असा पराक्रम करणारा पहिला बांगलादेशी गोलंदाज
पहिल्या दिवशी चार विकेट्स घेणाऱ्या हसन महमूद याने बुमराहची विकेट घेत पंजा मारला. भारतीय मैदानात कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला. यासोबतच भारताचा पहिला ३७६ धावांत आटोपला. जसप्रीत बुमराहनं ९ चेंडूत एका चाकौराच्या मदतीने ७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराज शून्य धावांवर नाबाद राहिला.
४०० पारचा डाव फसला! टीम इंडियाने ३७ धावांत गमावल्या ४ विकेट्स
भारतीय संघाने ६ बाद ३३९ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. अश्विन-जड्डू जोडी फुटल्यावर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव ४०० धावांचा टप्पा पार करण्याआधीच आटोपलाय. भारतीय संघाने ३७ धावांत ४ विकेट्स गमावल्या. यात तस्कीन अहमदनं ३ तर हसन महमूद याने १ विकेट घेतली. या विकेसह पहिल्या डावात पंजा मारण्याचा पराक्रम हसन महमूदनं करून दाखवला. या दोघांशिवाय बांगलादेशकडून नाहिद राणा आणि मेहंदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
Web Title: India vs Bangladesh, 1st Test Day 2 Hasan Mahmud End India First Inning With Five Wicket Haul Taskin Ahmed 3 Wickets India bundled out for 376
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.