चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अगदी मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसअखेर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी ५१५ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने धावफलकावर ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा लावल्या होत्या.
बांगलादेशच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजून ३५७ धावा करायच्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाला फक्त ६ विकेट्स मिळवायच्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवसाअखेर ढगाळ वातावरणामुळे खेळ वेळेआधी थांबला असला तरी हा कसोटी सामना भारतीय संघाच्या हातात आहे, हे चित्र एकदम स्पष्ट दिसते.
सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी, बुमराहनं फोडली ही जोडी
तिसऱ्या दिवशी अश्विनची दाखवली गोलंदाजीतील जादू; तिघांना धाडलं तंबूत
पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळाली नव्हती. पण तिसऱ्या दिवशी अश्विनने तीन विकेट्स घेत गोलंदाजीतील आपला धाक दाखवून दिला. शादमान इस्लामच्या रुपात अश्विनला या कसोटी सामन्यातील पहिलं यश मिळाले. त्याने ६८ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर मोमीनल हक १३ (२४) आणि मुशफिकूर रहिम १३ (११) यांनाही अश्विननं तंबूचा रस्ता दाखला.
बांगलादेशच्या कर्णधाराचं अर्धशतक, शाकिबही मैदानात
आघाडीच्या गड्यांनी तंबूचा रस्ता धरल्यावर बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसेन शान्तो हा मैदानात तग धरून उभा राहिला आहे. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी तो ६० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५१ धावांवर खेळत होता. दुसरीकडे शाकिब अल हसन १४ चेंडूत ५ धावांवर क्रिजवर होता.