India vs Bangladesh, 1st Test Day 3 : चेन्नई कसोटी सामन्यातील तिसरा दिवस रिषभ पंत आणि शुबमन गिल या जोडीनं गाजवला. दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या बांगलादेशसमोर डोंगरा एवढे आव्हान उभे केले आहे. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मानं ४ बाद २८७ धावांवर भारताचा दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३०८ धावांची भक्कम आघाडी मिळवली होती. तिसऱ्या दिवशी यात आणखी २०० + धावांची भर घालत टीम इंडियाने पाहुण्या बांगलादेशसमोर ५१५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. हे आव्हान परतवण्यासाठी बांगलादेशकडे खूप वेळ असला तरी भारतीय गोलंदाजीसमोर त्यांचा निभाव लागणं कठीण आहे.
पाहुण्या बांगलादेशसमोर डोंगराएवढ टार्गेट
भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ बॅटिंगला उतरला. पण त्यांना पहिला डावात फक्त १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला. दुसऱ्या डावातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे तीन गडी स्वस्तात आटोपले. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३०८ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशी शुबमन गिल आणि पंतच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्यांमोर ५०० + टार्गेट सेट केले.
तिसऱ्या दिवशी पंत-शुबमन गिलचा जलवा
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली त्यावेळी शुबमन गिल ३३ तर रिषभ पंत १२ धावांवर खेळत होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचली. पंतनं शुबमन गिलच्या आधी शतक झळकावलं. त्याने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १०९ धावांची दमदार खेळी केली. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलनं शतक साजरे केले. भारतीय संघाच्या धावफलकावर ४ बाद २८७ धावा असताना रोहितनं डाव घोषित केला. गिलनं १७६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ११९ धावांचं योगदान दिले. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल १९ चेंडूत ४ चौकारासह २२ धावांवर नाबाद परतला.